भटके आदिवासी समुहाला आजही मुलभूत समस्या व मुलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याने, भटक्यांना सर्व पातळीवरच संघर्ष करावा लागणार आहे असे प्रतिपादन विचारवंत प्रा.अंजलीताई मायदेव यांनी केले, त्या पुढे म्हणाल्या की ही संवादयात्रा म्हणजे मानवी हक्क मिळवण्यासाठीची व्यापक आंदोलन आहे.त्यामुळे ही चळवळ यशस्वी होऊन थाबली पाहिजे.असे मत त्यांनी व्यक्त केले.भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने राज्यव्यापी संवादयात्रा अकोला शहरात पोहोचली, त्यावेळी अशोक वाटिका येथे फटाके वाजवून भव्य असे स्वागत करण्यात आले. याठिकाणी सुनील अहिरे यांनी भीमगीते सादर केली.तसेच मान्यवरांच्या हस्ते म.फुले, गौतम बुद्ध यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जाहीर सभा झाली, यामध्ये प्रशांत गावडे, डॉ.आशा मिरगे, मुमताज शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना संवाद यात्रेचे समन्वयक अॅड.अरुण जाधव म्हणाले की, भटके विमुक्त आदिवासींच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अवहेलनाच वाट्याला आल्या आहेत,सतत त्यांना गुलाम म्हणून वागणूक मिळत आहे, भटक्यांना कधीच योजनांचे लाभ, सामाजिक न्याय, प्रतिष्ठा, सन्मान, पर्याप्त निधी मिळाला नाही, म्हणूनच संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही आमच्या हक्काचा वाटा मागायला निघालो आहोत,आता आरपारची लढाई करूनच आम्ही शांत बसणार आहोत, तरी यासाठी सर्व भटके, विमुक्त ,आदिवासी ,वंचित समाजाने २३ सप्टेंबर रोजी बहुसंख्येने मुंबई होते विराट रॅलीमध्ये सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी, असे अॅड.अरुण जाधव यांनी आवाहन केले.
त्यानंतर अकोला शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करीत रॅली काढण्यात आली.यावेळी संवाद यात्रेतील स्थानिक संयोजन व राज्य कोअर कमिटीतील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना आपल्या १७ मागण्यांचे निवेदन सादर केले,या शिष्टमंडळात अॅड.अरुण जाधव, मुमताज शेख, भावना वाघमारे, ललिता धनवटे, मुनींर शिकलगार,रजनी पवार, रावसाहेब राठोड, दिव्या चव्हाण,सपना पवार,सागर राजूरकर यांचा समावेश होता. सुरूवातीला संयोजक रजनी पवार यांनी स्वागत व सुत्रसंचलन केले.तर अजय सोळंके,राज भोसले, यांनी या रॅलीचे नियोजन केले.