श्रीमती आनंदीबाई मालोकार कृषि तंत्र विद्यालय, निंबी मालोकार येथे गाजर गवत निमृलन सप्ताह साजरा करण्यात आला

अकोला:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणा-या श्रीमती आनंदीबाई मालोकार कृषि तंत्र विद्यालय, निंबी मालोकार येथे गाजर गवताच्या विपरीत परिणामाची जनजागृती होण्याच्या दृष्टीने दर वर्षी ऑगस्ट महिन्यात गाजर गवत निर्मूलन जागरूकता सप्ताह १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान देशभर एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून राबविण्यात येतो. गाजर गवत निर्मूलन सप्ताहात प्राचार्य श्री. डब्लु. व्ही. मोरे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनमध्ये जनजागृती करण्यात आली. गाजर गवत है गाजराच्या रोपट्यासारखी पाने असणारे तण असून त्याचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टोयोफोरस’ आहे. विदेशी असलेल्या गाजर गवतास देशातील विविध भागांत पांढरी टोपी, चटक चांदणी, गंधीबुटी आदी नावांनी संबोधले जाते. गाजर गवत हे तण जगभर सर्वाधिक उपद्रवी वनस्पती म्हणून ओळखले जाते. या विदेशी तणाचा प्रथम प्रादुर्भाव पुणे येथे १९५५ साली आयात केलेल्या मिलो पील ४८० धान्यातून झाल्याचे दिसून आले. रस्ते, रेल्वेमार्गाच्या दुतर्फा, मैदाने, पडीक जागेत आढळणारे गाजर गवत तण अल्पावधीत शेताचे बांध, चराऊ कुरणे, फळबागा, विविध हंगामी आणि बारमाही पिकांमध्ये आढळून आले.

गाजर गवत तणाच्या झपाट्याने उगविण्यामुळे इतर वनस्पतीच्या उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. जैवविविधतेला व पर्यावरणाचे नुकसान होण्यासोबतच गाजर गवतामुळे मानवाच्या त्वचेवरील आजार, एलर्जी आणि ताप, दमा आदी रोग होतात. जनावरांसाठी हा तण विषारी आहे. बगिचा, शेती, रस्ता आणि रेल्वे मार्गाच्या बाजूला गाजर गवत जमिनीचा सामूहिक ताबा घेते. पिकांपेक्षा याची वाढ झपाट्याने होत असून, पिकांमध्ये पाणी, हवा, अन्नद्रव्याची स्पर्धा करतात. पर्यायाने पिकांचे उत्पादन कमी होऊन धान्यांची प्रत खराब होत असून, गाजर गवताचे वाढते प्रमाण देशासाठी घातक आहे मेक्सिकन भुंग्यां‌द्वारे नियंत्रण शक्यः-

गाजर गवतावर नियंत्रणासाठी फुले येण्यापूर्वीच ही झाडे उपटून नष्ट करावीत, अकृषी क्षेत्रात त्या झाडांवर मात करून वाढणाऱ्या स्पर्धात्मक तरोटा या वनस्पतीची वाढ करून गाजर गवताची वाढ रोखता येते. मेक्सिकन बिटल (झायगोग्रामा बायकोलोराटा) नावाचे शत्रू किडे (५०० ते १००० भुंगे) पावसाळ्यात

गाजर गवतावर सोडल्यास ते गाजर गवत खातात.

श्रीमती आनंदीबाई मालोकार कृषि तंत्र विद्यालय, निंबी मालोकार येथील सर्व कर्मचारी, मजुर व व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विद्यालयीन परीसरातील गाजर गवत उपटुन नष्ट केलेत या प्रसंगी प्राचार्य श्री. डब्लु. व्ही. मोरे, श्री. एन. एस. भगत श्री. जी. पी. सुरळकर, श्री. वि.ए. इंगळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published.