
अकोला दिनांक २१/८/२४: डॉ.बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशन अमरावती विभाग अमरावतीच्या वतीने महामहीम राष्ट्रपती व माननीय प्रधानमंत्री यांना जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत निवेदन देऊन कोलकत्ता येथील आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व निर्घृण खून प्रकरणातील दोषींना तातडीने कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, संपूर्ण देशाला काळीमा फासणारी आणि अत्यंत निंदनीय, माणुसकीची घोर विटंबना करणारी, क्रूर अशी संतापजनक घटना पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथील आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडली. त्या घटनेचा संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट आहे. कारण त्या महिला डॉक्टरला रुग्णालयात चालणारे काळे धंदे उघडकीस आणायचे होते. त्यासाठी तिने आपल्या मोबाईल मध्ये पुरावे गोळा केले होते. मात्र नराधमांनी त्या डॉक्टरला अत्यंत क्रूर व हिंस्त्र पद्धतीने मारझोड करून तिच्या अर्धमेल्या शरीरावर पाशवी अत्याचार केला. हे प्रकरण ताजे असतांनाचमहाराष्ट्रातील बदलापूर येथे एका नामांकित व राजकीय वरदहस्त असलेल्या शाळेत चार व सहा वर्षाच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आणि जनतेचा उद्रेक उफाळून आला. जनतेने स्वयंस्फूर्त आंदोलन करून सरकारचा नाकर्तेपणा उघड पाडला. त्यातच आता अकोला जिल्ह्यात काजिखेड येथील जिल्हा परिषद शाळेत सहा मुलींवर शिक्षकाकडून अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात मुली व महिला सुरक्षित आहेत काय? शासन, प्रशासन एव्हढे बेशरम कसे झाले? हा प्रश्न यानिमित्त निर्माण झाला आहे. देशात आणि राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे पोलीस फक्त राजकारण्यांच्या संरक्षणासाठी आहेत असेच यावरून दिसते. त्यांना सामान्य लोकांची, समाजाच्या सुरक्षेची अजिबात तमा नाही असेच म्हणावे लागेल. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी कायदे आहेत पण त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आणि पोलीस प्रशासन फक्त राजकीय लोकांसाठी कामाला जुंपले असून त्यांना कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे ते कठोर भूमिका घेऊन गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास असमर्थ ठरले आहेत.देशात आणि राज्यात सगळे सत्ताधारी हम करे सो कायदा या न्यायाने मस्तीत वागतात. कायद्याच्या यंत्रणांवर दबाव टाकतात. म्हणूनच गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत आहे. त्यामुळे जर शासन ताळ्यावर आले नाही तर लोकांमधील उद्रेकाचा भयंकर स्फोट होईल आणि संपूर्ण समाजजीवन धोक्यात येईल. करिता या सर्व प्रकरणातील गुन्हेगारांना मग ते कितीही मोठे असो, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असो त्यांना कुणीही पाठीशी न घालता तातडीने कठोरातील कठोर शिक्षा होणे काळाची गरज आहे. अन्यथा देशात आराजक माजेल आणि त्यासाठी पूर्णतः शासन व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशन (डाटा) अमरावती विभाग, अमरावतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात प्रा.डॉ.एम.आर.इंगळे, प्रा. डॉ. संदीप भोवते, प्रा.राजा शंभरकर, राम शेगोकार सर, प्रा. डॉ.भास्कर पाटील, प्रा. विजय आठवले, प्रा. डॉ. मनोहर वासनिक, प्रा. डॉ. राजेश नितनवरे, प्रा.डॉ.बाळकृष्ण खंडारे, प्रा.बी.एस.इंगळे, प्रा. डॉ. उमेश पाटील, प्रा.अनिल निंबाळकर, प्रा. राहुल माहुरे, प्रा.संजीव वाहूरवाघ, प्रा.ऍड.आकाश हराळ, सूरज मेश्राम, आकाश शिरसाट, मिलिंद इंगळे, महेंद्र भोजने, सुरेश मडावी, शुभम गोळे, आकाश मेश्राम इत्यादिंचा सहभाग होता.—+++++++++++