अकोला प्रतिनिधी: प्रशिक मेश्राम
अल्पवयीन व्यक्तीस वाहन चालविण्यास लायसन्स मिळत नसले तरी अशा मुलांचे वाहन चालविण्याचे प्रमाण वाढत आहे, अल्पवयीन मुलांना वाहन कसे चालवावे याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण नसते, वाहतुकीचे नियमांची माहिती नसते पण तरी पालाकांकडुन त्यांना वाहन चालविण्यास दिले जाते. मात्र अशा वाहन चालकांमुळे अपघात होवुन रस्त्यावर चालणा-या निरपराध लोकांच्या व अल्पवयीन वाहन चालकांची जिवीत हाणी व मोठी दुखापत होण्याची घटना वाढल्या आहेत.
अकोला जिल्हयातील पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांचे संकल्पनेतुन व पोलीस निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व अकोला जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत १८ वर्षा खालील अल्पवयीन वाहन चालविणारे वाहन चालक, मालक/पालक यांचेवर मोवाका व भा.दं.वि प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असुन पोलीस स्टेशन खदान व सिव्हल लाईन मध्ये दोन पालकावर गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदरचे गुन्हे हे न्यायालयात दाखल करण्यात येत असुन नमुद गुन्हयामध्ये ०३ वर्षा पर्यंत शिक्षा
व २५ हजार रू दंड व अल्पवयीन मुले /मुली वयाचे २५ वर्षा पर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळणार
नाही अशी शिक्षेची कायदयात तरतुद आहे.
करीता अनुज्ञप्ती न बाळगणा-या किंवा अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालविण्याची परवानगी देणारे वाहन मालक/आई-वडील/पालक व मित्र यांचे विरूध्द मोवाका व भा.दं.वि प्रमाणे गुन्हे नोंद करून कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अकोला जिल्हयातील सर्व पालकांनी आपल्या १८ वर्षा खालील (अल्पवयीन) मुलांना वाहन चालविण्या करीता देवु नये. दिल्यास मोवाका व भा.दं.वि प्रमाणे कडक कार्यवाहीला तोंड दयावे लागणार असे आवाहन मा. श्री. बच्चन सिंग साहेब पोलीस अधीक्षक यांनी अकोला जिल्हयातील नागरीकांना केले आहे.