आज २० मार्च, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह दिवस. याच दिवशी १९२७ साली, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य वर्गाच्या मानवी हक्कासाठी सत्याग्रह करून न्यायाचा लढा उभारला होता. या लढ्याचा अंतिम परिणाम म्हणून देशात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारित संविधान निर्माण झाले. देशातील चातुर्वर्ण्य व्यवस्था संपुष्टात येऊन लोकशाही राष्ट्र उभे करण्याचा मार्ग प्रशस्त झाला. माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा हक्क प्राप्त झाला. म्हणून हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.
महाडचा सत्याग्रह म्हणजे केवळ पाणी पिण्याच्या हक्काचा लढा नव्हता तर तो मानवी हक्काचा, मानवतेचा, समतेचा, स्वाभिमानाचा, मानवी स्वातंत्र्याचा लढा होता.
आपल्या देशात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला होता. त्यांना सार्वजनिक हॉटेल, पाणवठे, रस्ते, मंदिर इत्यादी ठिकाणी प्रवेश नव्हता, चांगले कपडे घालण्याचा, चांगले राहण्याचा, शिक्षण घेण्याचा, संपत्ती जमा करण्याचा असा कोणताच हक्क नव्हता. त्यांचे जगणे गुलामगिरीचे आणि कुत्र्या मांजरापेक्षाही हिन होते. त्यांचा स्पर्श म्हणजे विटाळ समजला जात होता आणि जिथे कुत्रे, मांजरे, ढोरं पाणी पितात त्या ठिकाणी या अस्पृश्य वर्गातील माणसाला पाणी पिण्यास बंदी होती. म्हणून आम्हीही माणसं आहोत त्यामुळे आम्हालाही इतरांप्रमाणे माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळविणारच यासाठी केलेला मानवी हक्काचा संघर्ष म्हणजे महाडचा सत्याग्रह होय. या सत्याग्रह प्रसंगी केलेल्या आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य वर्गाला ” जागृतीचा विस्तव कधीही विझवू देऊ नका” असा मोलाचा संदेश दिला. या दिनानिमित्त मानवी हक्कासाठी लढणारे महायोद्धा, महामानव, सिम्बॉल ऑफ नॉलेज, प्रज्ञासूर्य, भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र जीवन संघर्षाला, त्यांच्या स्मृतीला आणि विचारांना कोटी कोटी प्रणाम…
विनम्र अभिवादन… – डॉ. एम. आर. इंगळे