अबकी बार ४०० पार, तर का घाबरतोय चौकीदार?-चंद्रकांत झटाले

गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान आणि भाजपचे लोक ‘अबकी बार ४०० पार’ चा नारा लावून त्यांचा डळमळीत झालेला आत्मविश्वास लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. जर अबकी बार भाजप ४०० पार जाणार असा तुम्हाला विश्वास आहे तर देशभरातील विरोधी पक्षाच्याच नेत्यांवर इडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून का दबाव टाकत आहात? जे लोक विरोधात बोलतात त्यांच्या चौकश्या का लावत आहात? तुम्हाला जर विश्वास आहे की तुम्ही लोकांची कामे केली आहेत, देशाचा विकास केला आहे आणि लोक सरकारच्या कामावर विश्वास ठेऊन पुन्हा भाजपला मत देतील तर विरोधकांना सांगा ना की, तुम्हाला वाटेल ते करा, सभा घ्या, रॅली घ्या, यात्रा काढा, आमच्या विरोधात प्रचार करा आम्हाला काहीही फरक पडत नाही. जर विश्वास आहे तर घाबरता का?
आज विरोधकांना आंदोलनजीवी म्हणणारे आरएसएस- जनसंघ, भाजपचे लोक हे देश स्वतंत्र झाल्यापासून कायम देशात सत्तेवर असलेल्या सरकारच्या विरोधात आंदोलने करत आले आहेत. म्हणजेच खरे आंदोलनजीवी आहेत. पण ह्या लोकांचं नशीब की २०१४ पर्यंतचे कोणतेच सरकार यांच्यासारखे खुनशी आणि सूड प्रवृत्तीने वागणारे नव्हते. तत्कालीन सरकारांमध्ये तितकी नैतिकता आणि समज होती की लोकशाही टिकविण्यासाठी विरोधी पक्ष तितकाच महत्वाचा आहे. म्हणून पंडित नेहरूंनी भारताच्या मंत्रिमंडळात विरोधी पक्षातील सहा लोकांना स्थान दिलं होतं. आज विरोधी पक्षातील सदस्याला मंत्रिमंडळात स्थान देणे दूरच विरोधकांना देशद्रोह्यांसारखी वागणूक दिली जात आहे. विरोधी पक्षनेते सोडा पण मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या तीन सदस्यीय समितीमधून सरन्यायाधीशांनासुद्धा काढून टाकलं जातंय. राजकीय पक्षांना मिळणारा निधी कुणी दिला? किती दिला? ही माहिती आता माहिती अधिकाराच्या कक्षेतून काढून टाकली आहे. पारदर्शक पणाचा ढोल बडवणाऱ्या मोदी सरकारला या गोष्टींचा इतका त्रास का होतो हे न समजण्याइतकी जनता नक्कीच दूधखुळी नाही. जर स्वतः वर विश्वास आहे तर हे सर्व उपद्व्याप करण्याची गरज का पडते?

      तुम्ही जर देशाला यशाच्या शिखरावर नेले आहे, प्रचंड विकास केला आहे तर त्या विकासाच्या नावाने मते मागा ना? का कारगिल शहिदांच्या नावावर, पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या नावावर, धर्माच्या, बजरंगबलीच्या आणि रामाच्या नावावर तुम्हाला मते मागावी लागतात? का तुम्ही लोक तुम्ही काय विकास केला हे सांगू शकत नाही? कामे करणे आणि कामे केल्याच्या जाहिराती करणे यात फरक असतो. कोरोनाकाळापासून तर आताच्या सभांपर्यंत पंतप्रधान प्रत्येक सभेत जाऊन त्या त्या राज्य-जिल्ह्यासाठी ५ हजार करोड, २० हजार करोड, ५० हजार करोडचे पॅकेज घोषित करतात पण पण सामान्यांच्या हातात काहीच लागत नाही.

      ८० कोटी जनतेला मोफत धान्य द्यावं लागतंय याची लाज बाळगायला हवी तर तुम्ही लोक अभिमानाने जाहिरात करता? संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार साल २००६ ते २०१४ दरम्यान म्हणजेच मनमोहनसिंग (काँग्रेस) सरकारच्या काळात भारतातील २७ करोड १० लाख लोक गरिबीतून मुक्त झाले. म्हणजेच दारिद्ररेषेच्या वर गेले. त्यांचा जीवनस्तर उंचावला. या उलट मोदी सरकार सत्तेत आल्यापासून २०२१ पर्यंतच भारतातील २३ कोटी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली ढकलली गेली आहे, तरीसुद्धा सरकार सांगत राहते की सर्वांचा भरपूर विकास होतो आहे.

     महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर एक पोलीस आयुक्त १०० कोटी खंडणी वसुलीचा आरोप करतो. या आरोपाचा कुठलाही पुरावा माझ्याकडे नाही म्हणून कोर्टात सांगतो. तरी अनिल देशमुख वर्षभर तुरुंगात राहतात. १०० कोटींचा आरोप आहे तर चौकशी ही झालीच पाहिजे, यावर कुणाचंच दुमत नाही. पण त्याचबरोबर फक्त मोदींच्या कार्यकाळात देशात तब्बल ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांचे बँक घोटाळे झाले आहेत. आणि गेल्या ९ वर्षात मोठ्या उद्योगपतींचे ८ लाख १७ हजार कोटी रुपयांची बँक कर्जे माफ केली गेली आहेत याची पण चौकशी झाली पाहिजे ना?  गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींची ड्रग्ज पकडली जाते, पुलवामा हल्ल्यात ४० जवान मारले जातात, राफेल विमान खरेदीत ५८ हजार कोटींची घोटाळा झालाय, १९ लाख ईव्हीएम मशीन कारखान्यातून निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी मध्येच गायब होतात, ८८ हजार कोटी रुपये छापखान्यातून निघतात आणि रिझर्व्ह बँकेत पोचण्यापूर्वीच गायब होतात, अयोध्येत राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा झाला त्याचे पुरावे आहेत या प्रकरणांची चौकशी व्हावी असे कुणालाच का वाटत नाही.

   आपल्या देशातील मतदारांच्या आकलन क्षमतेतच या लोकांनी लोच्या करून ठेवला आहे. भाजप सरकारने जर देशात खरेच काम केले असेल तर त्यांना अनेक राज्यांमध्ये आमदारांची फोडाफोडी का करावी लागते? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत आणि खंडीभर पुरावे असल्याच्या वल्गना केल्या अशा भ्रष्ट नेत्यांना का पक्षात घ्यावे लागते? अजित पवार उद्धव ठाकरे सोबत असले तर वाईट आणि भाजप सोबत असले तर पवित्र असे कसे? उद्धव ठाकरे अजित पवारांसोबत गेले तर त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि भाजप अजित पवारांसोबत गेला तर हिंदुत्वासाठी गेला? इंदिरा गांधींनी पारशी व्यक्तीसोबत लग्न केलं तर त्या कट्टर मुस्लिम आणि स्मृती इराणी यांनी पारशी व्यक्तीसोबत लग्न केलं तर त्या कट्टर हिंदू? "कोई भ्रष्टाचारी मेरा ताप नही सह सकता" असं म्हणणाऱ्या मोदीजींनी शुभेन्दू अधिकारी, हेमंत बिस्वा सरमा, अजित पवार, अशोक चव्हाण ई. अनेक नेत्यांना फक्त पक्षात घेतलं नाही तर त्यांना अत्यंत सन्मानाचं स्थान दिलं, हे मतदारांना का दिसत नाही? मोदीजी १० वर्षात एकही पत्रकार परिषद का घेत नाहीत? गेली १० वर्षे सत्तेत असूनही नेहरूंच्याच नावाने बोंबलणाऱ्या मोदीजींना कुणीतरी सांगितलं पाहिजे की, ६०० वर्षे मुघलांनी आणि १५० वर्षे ब्रिटिशांनी लुटलेल्या ह्या भूकेकंगाल देशाचे पहिले पंतप्रधान बनलेल्या पंडित नेहरूंना ब्रिटिशांच्या नावाने किमान १०० वर्ष रडत बसता आलं असतं. पण त्यांनी सुई सुद्धा न बनणाऱ्या या देशाला स्वयंपूर्ण बनवताना कुणालाच दोष दिला नाही.  

  मागील सरकारांना गेल्या ७० वर्षांचा हिशोब मागताना गेल्या ७० वर्षांपासून मार्च २०१४ पर्यंत भारत सरकारवर ५४ लाख ९० हजार कोटी रुपये कर्ज होते, ते आज २०५ लाख कोटी रुपये कसे झाले? सर्व गोष्टींवर जीएसटी लावून, रिझर्व्ह बँकेतील लाख कोटी रुपये रिझर्व्ह फ़ंड काढून, इंधन आणि गॅस सिलिंडर चे प्रचंड भाव वाढवून आणि अव्वाच्या सव्वा टोलटॅक्स वसूल करूनही फक्त ९ वर्षात देशावरील कर्ज चौपट कसे झाले? हे कर्ज कशासाठी घेतले? तो पैसा कुठे गुंतवला? याचाही हिशोब द्या. स्वतःला चौकीदार म्हणविणाऱ्या मोदीजींनी ह्या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत.
   भाजप सरकारची काळीबाजू- खोटेपणा चव्हाट्यावर आणणाऱ्या निर्भीड पत्रकार निरंजन टकलेंवर हल्ला होतो, निर्भय बनो टीमवर हल्ला होतो, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ दिले जात नाही, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप करून दबाव आणला जातो, एक तर भाजप किंवा तुरुंग यापैकी एक प्रवेश निश्चित केला जातो. महाराष्ट्रात निर्भय बनोच्या किती सभा घेण्यात आल्या? कुठे कुठे घेण्यात आल्या? त्यात कोणकोणत्या व्यक्ती-संघटना सहभागी होत्या? याची माहिती महाराष्ट्राचं गृहखात्याला तातडीने मागितली जाते. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला खोडा घालण्याचा प्रयत्न होतो, राहुल गांधींच्या न्याय यात्रेची टी शर्ट घालून आहे म्हणून एका व्यक्तीला मेट्रो मध्ये प्रवास नाकारला जातो. महुवा मोईत्रा सारख्या निर्भीड खासदारांचे निलंबन केले जाते, ट्रोल करत बदनामी केली जाते,  हे सर्व का करताय? का घाबरताय? तुम्ही जशी स्वातंत्र्यापासून सरकारला विरोध करण्यासाठी मोकळीक घेतली तशी द्या विरोधकांना मोकळीक. सांगा त्यांना की तुम्ही लावा किती ताकद लावायची, करा जे करायचं ते पण आम्ही ४०० पार जाणारच.
     तुमचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, देशाच्या सर्व यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत, सर्व मीडिया २४ तास तुमचे गुणगान गात असतात, हजारो कोटींच्या जाहिराती सातत्याने सुरु आहेत. मग जर इतकाच विश्वास आहे की अबकी बार ४०० पार, तर का घाबरतोय चौकीदार? 
- चंद्रकांत झटाले अकोला

Leave a Reply

Your email address will not be published.