अमरावती/प्रतिनिधी:
अमरावती येथे दि अशोका बुद्धिस्ट फाऊंडेशन,अमरावती द्वारा वर्षावास समापन समारोह निमित्त कठिणा महोत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. वैष्णवी संतोष हागोणे हिने प्रथम पारितोषिक प्राप्त केले.
नुकताच अमरावती जिल्ह्यात दि अशोका बुध्दीस्ट फाउंडेशन तर्फे कठिणा महोत्सव मोठ्या प्रमाणात पार पडला. त्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले होते. त्यातीलच एक भाग म्हणून राज्यस्तरीय भव्य खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रविण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत वेगवेगळे सामाजिक विषय ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील रायगड, पुणे, नागपूर, यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात अकोला विधी महाविद्यालय अकोला येथे एल. एल. एम. चे शिक्षण घेत असणाऱ्या कु. वैष्णवी संतोष हागोणे यांनी ‘विद्रोहाचा अग्नी तेवत असू दे’ या विषयावर सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत पहिले पारितोषीक प्राप्त केले. बक्षिसाचे स्वरूप हे रोख रक्कम १०,०००/-, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे ठेवण्यात आले होते. तेव्हा समाजाच्या विविध स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.