धम्मचक्र गतिमान करण्याचा संकल्प करू या…!

आज अशोक विजया दशमी अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिन. १३ ऑक्टोबर, १९३५ साली नासिक जिल्ह्यातील येवले येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही.” म्हणजे मी धर्मांतर करणार अशी भिमगर्जना केली होती आणि तब्बल २१ वर्षानंतर १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी आपली ही प्रतिज्ञा पूर्ण केली. “न भूतो न भविष्यती” अशी अद्वितीय धम्म क्रांती घडविली. तो दिवस समस्त भारतातच नव्हे तर जगातही धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

बंधू जनहो…! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा देवून माणुसकीचं, सन्मानाचं, स्वाभिमानाच जीवन जगण्याचा मार्ग दिला. त्यामुळेच आम्ही आज सुखाचं जीवन जगत आहोत. याची प्रत्येकाने जाणीव ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिल्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे १५ ऑक्टोबर, १९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत बौद्ध धर्माचा स्वीकार यासंबधी जे उद् बोधक, स्फूर्तिदायक आणि अत्यंत तळमळीचे, माहितीपूर्ण भाषण दिले होते. त्याची आठवण ठेवणे बौद्ध धम्माचे खरे अनुयायी होण्यासाठी आवश्यक आहे. कारण ते भाषण लाखमोलाचे आहे. बौद्ध धम्म म्हणजे काय? तो कसा आचरणात आणावा हे समजून घेण्यासाठी आणि धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी नितांत गरजेचे आहे. या भाषणातील काही मुद्दे आम्ही समजून व उमजून आमचे आचरण करणे फार महत्वाचे आहे. तरच बौद्ध धम्म गतिमान करण्यासाठी आम्ही आपले योगदान देण्यास समर्थ ठरू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की *, “एकाही माणसाने, मी बौद्ध धर्मच का स्वीकारला हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला. हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करतांना धर्म कोणता व का घ्यावयाचा हे तावून सुलाखून पाहिले पाहिजे. ते पुढे म्हणतात की, मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.*” म्हणजे त्यांना केवळ बौद्ध धम्म स्वीकारून बौद्ध म्हणवून घेणारा समाज अपेक्षित नव्हता. तर धम्म समजून घेऊन तो कसोशीने पाळणारा समाज हवा होता. त्यांना फक्त सांकेतिक बुद्ध माणूस नको होता तर बुद्ध धम्माची तत्वे आचरणात आणून काया, वाचा, मनाने शुद्ध असणारा माणूस हवा होता. त्यामुळे आम्ही खरचं तावून सुलाखून बौद्ध धम्म स्वीकारला का? या प्रश्नाचा आपण समस्त बौद्ध धर्मीय लोकांनी आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण जर आम्ही बौद्ध धर्म व बौद्ध धम्माची संस्कृती समजून उमजून स्वीकारली असती तर मग आजही आम्ही त्याच जुन्या रुढी, परंपरा, देव, धर्म, कर्मकांड, पूजाअर्चा, अंधविश्वास यातच गुरफटलेले असतो का? याबाबत गंभीरतेने विचार होणे आवश्यक आहे.याच भाषणात ते म्हणतात की, *”माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो. मला अशी माणसे हवी आहेत. कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारध करणारी माणसं निर्माण झाली पाहिजेत.”* काय आमच्या समाजात अशी पारध करणारी, समाजाचे संरक्षण करणारी विद्वान माणसं निर्माण झाली कां? आम्ही शिकलो, मोठमोठ्या पदव्या घेतल्या, संघर्षही केला आणि त्यासाठी संघटना उभारल्या. मात्र आमचा संघर्ष केवळ आरक्षणासाठी, आमच्या उपजिविकेसाठी होता. त्यात समस्त वंचित घटकांच्या उत्थानाचे सूत्र नव्हते. आमचा संघर्ष प्रासंगिक होता त्यात समाजाच्या आर्थिक व सामाजिक जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणण्याची ताकत नव्हती, असेच म्हणावे लागेल. कारण जर ती ताकद असती तर आज एवढी भयंकर स्थिती निर्माण होऊन प्रतिक्रांती उफाळून आली नसती. मनुवाद व चातुर्वर्ण्य व्यवस्था पुनश्च प्रस्थापित करणारी प्रतिगामी विचाराची माणसं आम्ही सत्तेत बसविली नसती. लोकशाही व भारतीय संविधानाचा खून करून हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार चालविणारी बिनडोक व उलट्या काळजाची माणसं शासन संस्थेत पाठविली नसती.

याच भाषणात शेवटचा मुद्दा जो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला व आम्हाला फार मोठा संदेश दिला तो म्हणजे, ते म्हणतात, *” मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही.हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे. काही इच्छिलेले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान विसाव्वा हिस्सा या कामी देईन, असा निश्चय करावा. मला सर्वाँना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागतांनी काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना “या धर्माचा प्रचार करा” असा आदेश दिला. त्याप्रमाणे पुढे यश व त्याच्या चाळीस मित्रांनी बौद्ध दीक्षा घेतली. यश हा श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंताने सांगितले, हा धर्म कसा आहे? तर “बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, धम्म आदि कल्याण, मध्य कल्याण, पर्यावसान कल्याण” त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागतांनी आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला.आता आपणालाही यंत्रणा तयार करावी लागेल. म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो.”*

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितले की, आता तुमचीही जबाबदारी मोठी आहे. म्हणजे आम्ही धम्माची तत्वे समजून घेऊन आदर्श समाज निर्माण केला पाहिजे. इतरांना आदर वाटेल व इतर लोकं आपल्याकडे आकर्षित होतील, आपला सन्मान करतील, आपणही या धम्माचे अनुयायी व्हावे ही इर्षा त्यांच्यात निर्माण होईल एवढा प्रज्ञावंत, शीलवंत, सदाचारी आदर्श समाज आम्ही निर्माण केला पाहिजे. आमच्या समाजातला प्रत्येक माणूस मैत्री, करुणा, बंधुता, न्याय, समता या तत्वांची सांगड घालून जीवन जगणारा सदाचारी माणूस घडला पाहिजे. परंतु आम्ही तसा आदर्श समाज व माणूस घडवू शकलो का? हा प्रश्न आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला केवळ बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली नाही तर हा धम्म व्यवस्थित कळावा यासाठी मार्गदर्शक म्हणून “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ लिहिला. तो १९५७ मध्ये प्रकाशित झाला. यासोबतच त्यांनी १९५४ साली दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची स्थापना करून ४ मे, १९५५ रोजी तिची रितसर नोंदणी केली. ही संस्था तमाम बौद्धांची मातृसंस्था आहे. या संस्थेची घटना व उद्दिष्ट्ये त्यांनी स्वतः तयार केली. त्यानुसार आम्ही बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करून भारत बुद्धमय करण्यासाठी झटत आहोत का? हा फार गहन चिंतनाचा प्रश्न आहे. आजची परिस्थिती फार गंभीर आहे. बौद्ध म्हणवून घेणारा समाज खऱ्या अर्थाने सदाचारी समाज झाला असे म्हणण्याचे धाडस कोणीच करणार नाही. कारण समाजातील व्यसनाधीनता संपली नाही. अज्ञान, द्वेष, राग, लोभ, मत्सर, हिंसाचार वाढतच आहे. माणूस माणसाचा वैरी झाला आहे. त्यातच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षिलेला राजकीय पक्ष जो त्यांच्या हयातीत स्थापन होऊ शकला नाही. त्या “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया” चे आम्ही स्वार्थासाठी अनेक तुकडे केले आणि राजकीय शक्ती गमावून बसलो. समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९४५ मध्ये स्थापन केलेल्या “पीपल्स एज्युेशन सोसायटी” ची आज दुरावस्था झाली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचेही दोन तीन गट आहेत. धम्मचळवळ गतिमान करण्यासाठी शक्ती खर्च करण्यापेक्षा समाज व विशेषतः तरुण वर्ग राजकीय झेंडे खांद्यावर घेऊन राजकारण्यांचे बाहुले बनले आहेत. एकूणच काय तर आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार, त्यांचे कर्तृत्व फक्त लेखन आणि भाषणासाठीच वापरले कृती मात्र त्यांच्या विचारांच्या कितीतरी दूर आहे. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन समजून घेण्यात, त्यांनी दिलेला धम्म व त्यानुसार धम्माचरण करण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो असेच म्हणावे लागेल. आज तर लोकशाही आणि संविधान जे आमचे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, बौद्धिक, मानसिक हक्क, आमच्या शक्ती शाबूत ठेवून वृद्धिंगत करण्याचे कवच आहे तेच गमावून बसतो की काय अशी भीती वाटत आहे.

आमच्या समाजाची स्थिती चार आंधळ्या सारखी झाली आहे. जो तो म्हणतो की, मीच खरा आंबेडकरी अनुयायी आहे. तर काहींना वाटते आम्हीच बाबांचे विचार कृतीत आणत आहोत, आम्हीच त्यांना अपेक्षित असलेले समाज उत्थानाचे कार्य करत आहोत. पण बाबांची समग्र सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्रांती आम्हाला कळली नाही किंवा ती समजून घेण्याची विद्वत्ता आमच्यात नाही असेच म्हणावे लागेल. म्हणून आता तरी सर्वांनी सारे भेद, द्वेष, मत्सर, राग, लोभ, मोह, माया, स्वार्थ, अहंकार, मीपणा बाजूला ठेवून आपली शक्ती, युक्ती, बुद्धी, विद्वत्ता विभाजित न ठेवता एकसंघ होऊन सामाजिक क्रांतीचा संघर्ष मजबूत केला पाहिजे तरच आम्ही व आम्ही निर्माण केलेल्या संस्था अबाधित राहतील. अन्यथा काळ सोकावतो आहे. रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे याची जाण आणि जागृती ठेवून कृतिशील होऊ या…त्यासाठी धम्म चळवळ, धम्म क्रांती गतिमान करू या…

नमोबुद्धाय, जयभीम, जयसंविधान…!!!

प्रा.डॉ.एम.आर.इंगळे, अकोला

Leave a Reply

Your email address will not be published.