तू खुले चवदार केले..प्रा. आकाश हराळ

पेटवून मशाल क्रांती निश्चयाचे वार केले
मुक्त करण्या मानवाला तू खुले चवदार केले..
पेटले तेव्हाच पाणी मांडली व्यथा अशी तू
यातनेच्या सागराचे मोकळे तू द्वार केले..
जाळली स्मृती अशी की कर्मठांना झोंबला तू
मोडली ती बंधने अन तू मनूला ठार केले..
तूच आहे मूकनायक फक्त अमुच्या जीवनाचा
तासुनी ऐसेच अमुचे शब्दही ही अंगार केले..
आज बाबा संगराची याद आली बघ तुझ्या या
केवढी किमया तुझी ही केवढे उपकार केले..
कवी:- प्रा. आकाश हराळ (अकोला)