अजून किती साहेबराव करपे ? – संतोष अरसोड

२० मार्च १९८६ या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण हे गाव प्रचंड आक्रोश करीत होते. नागपूर-जिंतूर या गाडीने आणलेल्या वृत्तपत्राने चिलगव्हाणच्या काळजाचा ठोका चुकवला. काल १९ मार्चला यात्रेच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियानी केलेल्या सामुहिक आत्महत्येची बातमी घेवून आले होते ते वृत्तपत्र. आजही ती बातमी गावाच्या काळजाला छिन्नविछीन्न करते. गेल्या 37 वर्षात गाव नेहमीच स्मरण करत आलं आहे साहेबराव करपे यांचं. वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात १९ मार्च १९८६ ला साहेबराव यांनी त्यांची पत्नी व चार चिमुकल्यांना विषयुक्त अन्न दिले व स्वतःलाही संपवले. शासनाची शेतकरी विरोधी धोरणे व त्यातून शेतीव्यवसायात आलेले अपयश हेच या सामुहिक मरणकांडाचे मुख्य सुत्र होते. बळीराजा म्हणून ज्याचा सन्मान केला जातो त्याने आयुष्याला झिडकारारून मृत्यूला कवटाळण्याची जी अव्याहत मालिका पुढे सुरू झाली त्याची सुरूवात करपे कुटुंबाच्या आत्महत्येनं झाली होती आणि ती दुर्दैवी तारीख होती.१९ मार्च १९८६ .चिलगव्हाण या गावात शेषराव करपे यांचे मोठे प्रस्थ होते. साहेबराव व प्रकाश ही दोन मुले व एक मुलगी असे हे कुटुंब. अर्धा एकर परिसरात असलेला भव्य वाडा अन त्या वाड्यात असणारा माणसांचा गोतावळा हे त्या वाड्याचे वैभव. शेषराव करपे यांच्याकडे सव्वाशे एकर जमीन. संगीतावर मनापासून प्रेम करणारे हे कुटुंब. गावातील तरुणांना संगीताचे धडे द्यावे ही या कुटुंबाची धडपड होती. म्हणूनच गाव तथा परिसरातील तरुणांसाठी त्यांनी संगीताचे मोफत वर्ग उघडले होते. या कुटुंबाने दिलेल्या संगीताच्या शिक्षणामुळे संगीतशिक्षक म्हणून काम करीत असलेल्यांची संख्या जवळपास वीस तरी असेल. साहेबराव करपे हा माणूस सुद्धा संगीत विशारद होता. संगीतावर एवढे जिवापाड प्रेम करणाऱ्या साहेबराव यांचे आयुष्य बेसूर झाले अन् १९ मार्च १९८६ ला त्यांच्या आयुष्याचीच भैरवी झाली.

आज 37 वर्षांनंतरही त्या आठवणी ताज्या झाल्या की चिलगव्हाण मूक आक्रंदन करते. तो चिरेबंदी वाडा आता निःशब्द झालेला आहे. वाड्याचा मालक बदलला आहे, सव्वाशे एकर जमिनीपैकी एक फूटही जागा करपे कुटुंबाकडे नाही. करपे जरी गावाला पोरके झाले असले तरी गाव मात्र त्यांच्या आठवणीने व्याकुळ होतो.साहेबराव करपे नावाचा हा तरुण धडाडीने काम करायचा. तब्बल १५ वर्षे तो गावाचा सरपंच होता. १२५ एकर जमीन व त्यासाठी जवळपास २४ माणसं त्यांच्या हाताखाली असायची. १० एच.पी.ची मोटर त्यांच्या विहिरीवर होती. शेतात नवीन प्रयोग करावे व त्यातून इतरांना प्रेरणा द्यावी म्हणून साहेबराव करपे यांनी शेतात केळी लावली. बँक व खाजगी कर्ज डोक्यावर होतेच. अशातच एम.एस.ई.बी.ने त्यांच्या घराची व शेतीची वीज कापली. आत्मसन्मावर दरोडा घालणारा हा प्रसंग साहेबराव यांच्या मनावर खोल परिणाम करून गेला. खचलेल्या लोकांचा आधार असलेला हा तरुण स्वतःच आतून पूर्ण खचला. आता जगायचं तरी कशाला हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पतीच्या मनातील काहूर मालतीच्या लक्षात आलेला नव्हता.

*१९ मार्च १९८६- यात्रा मृत्यूमार्गाची*

१९ मार्च १९८६ ला साहेबराव, मालती व विश्रांती (मुलगी), मंगला (मुलगी), सारिका (मुलगी), भगवान नावाचा मुलगा यात्रेच्या नावाखाली वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात गेले. बिचारा भगवान त्याच्या मावशीकडे होता. त्यालाही उद्या परत येवू असे साहेबराव यांनी सांगून सोबत घेतले. पत्नी व चार लेकरांना बापाचे मनसुबे माहित नव्हते. साहेबरावाने झिंक फॉस्फेट व डेमॉक्रॉन ही घातक रसायणे सोबत घेतली होती. दत्तपूर आश्रमात ते पोहोचले तेव्हा साहेबराव अस्वस्थच होता. तिथे गेल्यावर त्याने झिंक फॉस्फेट लावलेली भजी विश्रांती, मंगला व सारिकाला खावू घातली. भगवानला डेमॉक्रॉन पाजले. भगवानचा जीव जात नव्हता तर त्याच्या अंगावर घोंगडे टाकून नारळाच्या दोरीने त्याला संपवले. चार मुलांचा जीव गेल्यानंतर मालतीला व नंतर स्वतःला साहेबरावाने संपवले, तत्पूर्वी त्याने पाचही जणांच्या कपाळावर एक रुपयाचे कलदार (नाणे) ठेवले. स्वतःला संपविण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. या चिठ्ठीत त्याने आपली वेदना व्यक्त केली आहे. स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करण्यापूर्वी संगीतप्रेमी साहेबराव करपे यांनी ‘येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली’, या आयुष्याची दोरी कमी जाहली” हे भजन म्हटले. १९ मार्च १९८६ ला रात्री १२ वा. ४५ मिनिटांनी हे थरारनाट्य संपले. दुसऱ्या दिवशी या सामुहिक आत्महत्याकांडाने अख्खा महाराष्ट्र हादरला. चिलगव्हाण दोन दिवस मूक आक्रंदन करीत होता. सहा प्रेते जवळजवळ ठेवण्यात आली अन हजारो लोकांच्या साक्षीनं हे कुटुंब अग्नीच्या स्वाधीन होत काळाच्या उदरात गडप झालं. या घटनेस यंदा 37 वर्षे पूर्ण होत आहेत. सन 2017 पासून ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ हे आंदोलन शेतकरी नेते श्री.अमर हबीब यांच्या नेतृत्वात राज्यभर करण्यांत येते. यंदाही याची धग कायम आहे. अनेक ठिकाणी यानिमित्ताने पदयात्रा निघतात.अभिषेक शिवाल या संवेदनाशील तरुणाचा या विषयावरील माहितीपट सुद्धा बर्लिन महोत्सवात पोहोचला होता. वेदना साता समुद्रापार गेली या माहिती पटाने.

श्री.अमर हबीब नावाच्या एका ज्येष्ठ शेतकरी आंदोलकाच्या प्रेरणेने सुरू झालेले हे ‘अन्नत्याग’ आंदोलन यंदा लंडन मध्येही होत आहे. वकीलीचे शिक्षण घ्यायला गेलेले दीपक चटप लंडन येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर बसून उपवास करणार आहे. आजही शेतकऱ्यांची परवड थांबलेली नाही. रोज तीसचे वर शेतकरी आत्महत्या करतात. सरकार अन् निसर्ग नेहमीच धोकेबाजी करते. कृषीप्रधान देश म्हणून मिरवताना शेती आणि शेतकरी यांना कोणत्याही पक्षानं, कोणत्याही मुख्यमंत्र्यानं आणि कोणत्याही सत्तेनं कधीच हात दिला नाही. मदतीच्या घोषणा, कर्जाची नाटकं आणि नुकसानभरपाईची आणेवारी यांचं राकारणच केलं गेलं. आता तर मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या तळपायाला आलेल्या फोडांचही राजकारण होत आहे. वेदना पेरा, दुःख उगवा आणि उपेक्षाचं पीक काढा ही अवहेलनेची साखळी 37 वर्षे न चुकता सुरू आहे. साहेबराव करपे, आमच्या संवेदनाच करपून गेल्या आहेत हो. शेतकरी जगला पाहिजे असे कुणालाही वाटत नाही. शेतकरी मरतो आहे, त्याची अपत्यही आता टोकाचे पाऊल उचलत आहेत. मृत्यूचा हा क्रूर उत्सव थांबला पाहिजे म्हणून हे अन्नत्याग आंदोलन आहे. आपणही 19 मार्च ला एक उपवास अन्नदात्यासाठी करायला नको का?

लेखक: संतोष अरसोड, नेर जिल्हा यवतमाळ

मो. 9623191923

Leave a Reply

Your email address will not be published.