
‘‘शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न’’
स्थानिक – श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे मंगळवार दि.२७ डिसेंबर २०२२ रोजी, शिक्षणमहर्षी, डॉ.पंजाबराव उपाख्य भाउसाहेब देशमुख यांचा १२४ वा जयंती उत्सव मोठ्या हर्षोउत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८.०० वाजता श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा भगवा ध्वज फडकवून भाउसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. ट्रॅक्टरवर संत गाडगे बाबा व डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा लाउन सामाजिक संदेश देत प्रभात फेरी शहरातून काढण्यात आली. त्यामध्ये टाळ-मृदुगांच्या निनादात भजनी मंडळी, ढोल-ताशाच्या गजरात लेझिम पथक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, तसेच श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभात फेरीच्या समोर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोषाखातील विद्यार्थी सर्वांचे लक्ष आकर्षण करीत होता.
सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात ‘डॉ.पंजाबराव देशमुख यांचे जीवन आणि कार्ये’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.विनोद खैरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय, अकोला हे होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.डॉ. एकनाथ उपाध्ये, मा. प्रा.सुरेश राउत, मा.डॉ. पंढरीनाथ वाटाणे, मा.नानासाहेब देशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या आक्यूएसीचे समन्वयक डॉ.आशिष राउत, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.डॉ.विवेक हिवरे, श्री अशोक चंदन प्रबंधक हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख वक्ते आपल्या भाषणात म्हणाले- ‘‘डॉ.पंजाबराव देशमुखांचे व्यक्तिमत्व म्हणजे आधी केले मग सांगितले असे होते. त्यांना सतत येथील शेतकरी-शेतमजुरांच्या उत्थानाचा ध्यास लागलेला होता. म्हणून भारतातील शेतकरी सुजलाम-सुफलाम व्हावा हेच डॉ.पंजाबराव देशमुखांचे स्वप्न होते’’ असा त्यांच्या जीवनाचा पट त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून मांडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक प्रा.डॉ. विवेक हिवरे यांनी केले. पाहूण्यांचा परिचय प्रा.डॉ.संजय पोहरे यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा.डॉ.उज्वला लांडे यांनी केले आणि आभार प्रा.सचिन भुतेकर यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख तथा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विवेक हिवरे, डॉ.उज्वला लांडे, डॉ. संजय पोहरे, डॉ. संजय काळे, डॉ.संजय तिडके, डॉ. आनंदा काळे, प्रा.सचिन भुतेकर, डॉ.आशिष राउत, विद्यार्थी प्रतिनिधी रोहण बुंदेले, श्री महादेव मेहेंगे, प्रा.महेश फलके आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.