
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती होणार की, नाही…?
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार का…?
भिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहेत…?
या आणि अशा प्रकारच्या प्रचारकी प्रश्नावर सोशल मीडियावर व्यक्त होतांना आंबेडकरवादी तरुणांची चाललेली भावनिक घाई बघता वास्तव मांडले पाहिजे म्हणून हा लेखन प्रपंच…!! दोन राजकीय पक्षांची युती होण्यासाठी दोन्ही पक्षांची सर्व परिस्थितीत सहमती होणे आवश्यक असते, तेव्हा युती किंवा आघाडी होतं असते…!! युती किंवा आघाडी करणे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळूला असे होतं नाही…!! राजकारण हा धीराचा खेळ आहे, तसा तो नेतृत्वाच्या गुणांची कसोटी घेणारा सुद्धा असतो…!! शिवसेनेची भाजप सोबतंची २५ वर्षाची प्रदिर्घ युती का तुटली…?? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांनी स्वतः ला विचारला पाहिजे आणि त्यावर चिंतन केले पाहिजे…!!
गेल्या २५ वर्षाच्या अनुभवाने शिवसेनेला कळून चुकले आहे की, भाजप हा राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष शिवसेनेला गोड बोलून, केसाने गळा कापुन संपवितो आहे आणि म्हणून शिवसेनेला स्वतः चं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आज रोजी भाजपची युती तोडून महाविकास आघाडी सोबतं जावे लागले आहे…!! युतीचा अनुभव शिवसेनेसाठी वेदनादायी आहे, आजरोजी शिवसेना संपविणे हा एकमेव अजेंडा घेऊन केंद्रात सत्ताधारी असलेला भाजप लिड करीत आहे, सर्व शस्त्र आणि अस्त्रांचा वापर करीत आहे, त्यामुळे शिवसेना अडचणीत आहे, कुणासोबतं तरी युती करणे ही शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आवश्यक बाब झाली आहे…!! वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना युतीचा दांडगा अनुभव आहे, त्यापैकी केवळ एकच उदाहरण इथे नमूद करतो आहे…!!
१९९८ आणि १९९९ साली अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारिप बहूजन महासंघाने कॉंग्रेस पक्षासोबत युती केली होती, त्याचा अनुभव अतिशय वेदनादायी आहे…!! १९९६ सालच्या लोकसभेत कॉंग्रेस पक्षाला स्वतः च्या बळावर महाराष्ट्रातील ४८ पैकीं केवळ १५ खासदार निवडून आणता आले होते, तेव्हा शरद पवार कॉंग्रेस मध्ये होते. भारिप बहूजन महासंघाने लोकशाही आघाडी सोबतं निवडणूक लढली ११ जागा भारिप आणि ३जागेवर बहूजन महासंघाचे उमेदवार उभे होते.त्यापैकी ४जागेवर दुसऱ्या आणि ६जागेवर तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती…!! भारिप बहूजन महासंघाची ताकद लक्षात घेऊन कॉंग्रेस पक्षाने युती साठी प्रस्ताव दिला आणि म्हणून १९९८ साली बाळासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेस सोबतं युती केली आणि कॉंग्रेस पक्षाचे ३३ खासदार निवडून आले, रिपब्लिकन पक्षाचे ४ खासदार निवडून आले…!!
१९९९ ला पुन्हा निवडणूका लागल्या तेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला होता, कॉंग्रेस पक्षाचे बहूतेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पलायन करीत होते आणि कॉंग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. अशा आणिबाणीच्या आणि कॉंग्रेस पक्ष अडचणीत असतांना अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेस पक्षासोबत युती केली होती. खरं म्हणजे १९९९ साली भारिप बहूजन महासंघाच्या युती मुळे कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्रात अस्तित्व शिल्लक राहिले होते…!! , २००० साली महाराष्ट्र विधानसभेत भारिप चे तीन आमदार एक विधानपरिषद आमदार असे चार आमदार होते,कॉंग्रेस भारिप बहूजन महासंघाच्या युतीचे सरकार सत्तारुढ झाले विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि कॉंग्रेस पक्षाच्या विलासराव देशमुखांनी भारिप चे मखराम पवार, मंत्री, डॉ दशरथ भांडे मंत्री, रामदास बोडखे राज्यमंत्री आणि वसंत सुर्यवंशी आमदार यांना फोडले आणि भारिप बहूजन महासंघ संपविला हा कटू तथा वेदनादायी अनुभव बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिशी आहे…!! कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षाने रिपब्लिकन पक्षाचे तुकडे तुकडे केले आणि रिपब्लिकन पक्ष संपविला हा अनुभव आहे…!! भाजप या राष्ट्रीय पक्षाने आता शिवसेनेचे तुकडे करायला सुरुवात केली आहे, कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे…!!
भाजप,आणि कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष मोठे होऊ द्यायचे नाहीत हे वास्तव समजून घेणे आवश्यक आहे…!! राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रस्थापित तथा घराणेशाही चे समर्थन करणारा पक्ष आहे आणि म्हणून त्या पक्षाची विचारधारा ही भाजप आणि कॉंग्रेस सोबतं जुळणारी आहे….!! १९९८ साली कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी माधवराव शिंदे बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सकारात्मक आणि अतिशय गोड बोलायचे मात्र विलासराव देशमुख यांनी काटा काढला…!! आज शिवसेनेचे संजय राऊत बाळासाहेब आंबेडकर यांची स्तुती करतील अतिशय सकारात्मक बोलतील म्हणून हुरळून जायचे का…??? भावनिक होऊन त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरवून आम्ही काय कमावणार आहोत…??? राजकारण भावनेवर चालतं नाही. यशस्वी व्हायचे असेल तर अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचा ४१ वर्षाचा अनुभव आणि समाजाप्रती केलेला त्याग लक्षात घेऊन तरुण कार्यकर्त्यांनी राजकीय शहाणपणं अंगिकारलं पाहिजे असे मनोमन वाटते….!! जयभीम. @.भास्कर भोजने.