नांदेड येथे संपन्न झालेल्या धम्म मेळाव्यातील संपूर्ण भाषण…
धम्म मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ यशवंत चावरे, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे आलेले सर्व बौद्ध हिंदु व मुस्लीम सीख बहुजन बंधु आणि भगिनींनो हा धम्माचा कार्यक्रम असला तरी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय बौध्द महासभेच्या कार्यकर्त्या सोबत प्रचंड मेहनत घेऊन आजचा कार्यक्रम यशस्वी केला आहे.वंचित बहुजन आघाडीची प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी इथे उपस्थित आहे. किसन चव्हाण म्हणाले त्यांनी धम्म दीक्षा घेतली तशी मी धम्म दीक्षा घेतलेली नाही व 22 प्रतिज्ञाही घेतलेल्या नाहीत. मी हिंदुधर्मात शूद्राच्या घरात महिला म्हणून जन्माला आलेली, बहुजनांच्या उदार व सहिष्णु संस्कृती मधे वाढलेली आणि बुध्द कबीर फुले आंबेडकर तुकारामांचे विचार ऐकून देव व धर्माकडे चिकित्सक बुध्दीवादी तर्कनिष्ठ भूमिकेतून बघणारी मी व्यक्ती आहे. कालपरवा समाज माध्यमांवर ज्या टिकलीच्या विषयावर हिंदु संस्कृतीच्या स्वयंघोषित रक्षकांनी गुंडगिरी व दादागिरी केली त्या टिकली कुंकू बांगड्या मंगळसूत्राच्या औपचारिक रितीरिवाजां पेक्षा नातेसंबंधांमधे परस्पर विश्वास आणि प्रेमाचे बंधन श्रेष्ठ असते या विचारावर चालणाऱ्या आम्ही महिला आहोत आणि त्याहीपेक्षा स्वतःच्या खाजगी जीवनात लुडबुड करणार्यांना रोखण्याची धमक असलेली आमची चळवळ आहे.

धम्म मेळाव्यात वंचितच्या राजकीय कार्यकर्त्यांचे राजकारणी व्यक्तीचे काम काय ? हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो परंतू माझ्या दृष्टीकोनातून हा प्रश्न चुकीचा आहे. कारण राजकारण आणि धम्माचा संबंध नाही किंवा या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत असे मी मानत नाही. स्वतः बाबासाहेबांनी या दोन चळवळींचा संबंध अन्योन्य आहे असेच मानले आहे. धम्म ही मनुस्मृतीच्या विषमता, द्वेष, असहिष्णुता, असत्य, हिंसा या मूल्यांचे उच्चाटन करुन प्रेम, मैत्री, करुणा, समता, सत्य, अहिंसा या मूल्यांचा प्रसाराची प्रवर्तनाची चळवळ आहे. प्रज्ञा शील करुणा या मूल्यांवर विश्वास असणारा माणूस आणि समाज घडविण्याची चळवळ आहे. आणि बाबासाहेबांची राजकीय चळवळ ही मनुस्मृतीची विषमता भेदभाव व शोषणावर आधारित सामाजिक आर्थिक राजकीय व्यवस्था नष्ट करुन समता स्वातंत्र्य आणि लोकशाहीची व्यवस्था निर्माण करण्याची चळवळ आहे. स्वतः बाबासाहेबांनी धम्म कारणातील नैतिक आचरणाचा मार्ग राजकारणातही अंगीकारलेला आहे. राजकारण आणि धर्मकारण सारखेच महत्त्वपूर्ण मानलेले आहे. दोन्हीपैकी एकालाही दुय्यम मानलेले नाही.

मनुस्मृतीने इथल्या हिंदुंमधिल समस्त महिला दलितांमधिल महार मातंग चर्मकार ढोर ओबीसींमधील आगरी कोळी कुणबी भंडारी सुतार लोहार कुंभार धनगर वंजारी साळी माळी भटक्या-विमुक्ता मधिल पारधी कैकाडी डोंबारी अशा अठरापगड जातीतील माणसाला अनेक मूलभूत मानवी अधिकार नाकारले आहेत अक्षरबंदी मुळे पिढ्यानपिढ्यांची गुणवत्ता कुजवली आहे.आणि यातील सर्वात निर्णायक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील सहभागाचा व राजकीय सत्तेचा, राजकारण करण्याचा अधिकार नाकारला आहे. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षा नंतरही ही मनुस्मृती संपलेली नाही. बहुजनातील असे असंख्य जाती समुह आहेत की ज्यांना ग्रामपंचायत सारख्या प्राथमिक स्तरावरही निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळाला नाही मग लोकसभा विधानसभा तर फारच दूर दूरची गोष्ट आहे. संविधानाने मनुस्मृतीला पर्यायी व्यवस्था आणि ही व्यवस्था आणण्यासाठी कायदा दिला. परंतू इथल्या ब्राह्मणशाही व भांडवलशाहीने हातात हात घालून घराणे शाहीचे रूप धारण केले. संविधानाला अभिप्रेत असलेली सामाजिक लोकशाही इथे अवतरलीच नाही.
अधुनिकतेच्या नावाखाली जातींचे व्यवसाय भांडवल शाहीने गिळंकृत केले परंतू जातीव्यवस्थेतील जन्मजात उच्च नीचता कायम राहिली आणि शोषण व्यवस्था नष्ट झाली नाही तर अधिक भीषण झाली. मायक्रो ओबीसीतील असंख्य जाती देशोधडीला लागल्या अमेरिकेत जसे रेड इंडियन्स नष्ट झाले तशा अनेक जाती नामशेष झाल्या. आज वंचित बहुजन आघाडी या देशोधडीला लावलेल्या असंख्य अठरापगड जातींचा आवाज बनली आहे. राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी या राजकीय दृष्ट्या दुर्बल व सूक्ष्म असलेल्या जाती बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीने जागृत झालेला आणि मनुस्मृतीच्या व्यवस्थेशी बेडरपणे व लढाऊ पणे संघर्ष करण्यास सज्ज असलेल्या बौद्ध समाजा सोबत जोडत आहेत. आज या इथे या अठरापगड जातीतील हजारो कार्यकर्ते इथे आले आहेत. बाळासाहेबांच्या द्रष्ट्या नेतृत्वाकडे आस लावून पहात आहेत. हजारो वर्षांपासून जाती जातीतील विभागलेल्या समाजाला राजकीय दृष्ट्या एकत्र आणून सामाजिक समीकरण बनवण्याचे ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे व म्हणूनच कठिण आहे. कठिण असलेतरी अशक्य नाही.
समजुतदार पणा, मनाचा मोठेपणा आणि जाती अंताच्याअंतिम उद्दिष्टा प्रती बांधिलकी ठेवून काम केले तर आपण यशाकडे जाऊ शकतो. पण या लढाईत आपला आदर्श एकच तो म्हणजे 51 साली हिंदु कोड बिलाच्या आणि मागास वर्गिय आयोगाच्या प्रश्नावर सत्ते मधून बदल घडवता येत नसेल तर खुर्चीला चिकटून न बसता नेहरूंच्या मंत्रीमंडळाचा राजीनामा देणारे बाबासाहेब. बाबासाहेबांची खुद्दारी, नैतिकता व धेय्य निष्ठा घेऊन निवडणुकीचे राजकारण करण्या वाचून पर्याय नाही. इथल्या ग्रामपंचायत पासून लोकसभेत पर्यंत सर्व संस्थांवर मगरमिठी घालून बसलेल्या प्रस्थापित उच्चजातीय घराणेशाहीच्या पकडीतून देशाला व समाजाला मुक्त करण्याचे राजकारण म्हणजेच खरे धम्म कारण आहे. या सर्व पातळीवरील निर्णय घेणाऱ्या संस्थांमधे आपल्या वंचित बहुजनांना पाठवण्याचा निर्धार करुन बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या या सामाजिक क्रांतीची शपथ घेऊन कामाला लागुया.
जयभिम !