अकोला : गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नव्या पोलिस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात कालपासून जोरदार नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. २४ मेच्या रात्री ७ ते २५ मेच्या पहाटे १ वाजेपर्यंत जिल्हाभरात हा सघन तपास मोहिमेचा धडाका पाहायला मिळाला.
या मोहिमेत ६६ अधिकारी व २११ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ३४ नाकाबंदी पॉईंट्सवर तब्बल १०७९ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातून ५७१ वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करत २,08,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोम्बिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक निष्कर्ष
या मोहिमेत गुन्हेगारांवर चोख नजर ठेवत ८८ समन्स, २८ जामिनावरचे वॉरंट्स आणि ७ अटक वॉरंट्स तामील करण्यात आले. ६७ सराईत व माहितीगार गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. याशिवाय,
कलम १२२ मपोका अंतर्गत १० कारवाया
कलम १४२ मपोका अंतर्गत १ प्रकरण
भारतीय हत्यार कायद्यान्वये ७ हत्यारे जप्त
कलम ३३ आरडब्ल्यू अंतर्गत ७ प्रकरणे
कलम ११०, ११७ म.पो.का. अंतर्गत २३ प्रकरणे नोंद
याशिवाय ५० हॉटेल-लॉजेस आणि ३९ एटीएमची तपासणी करून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. एका तडीपार गुन्हेगारावर विशेष कारवाई करत जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे.
जिल्ह्याला गुन्हेमुक्त करण्यासाठी सज्ज पोलीस यंत्रणा
पोलिस अधीक्षक चांडक यांनी मालमत्ता व शरीराविरुद्ध गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी अशा मोहिमा राबवण्याची रणनीती आखली असून, यापुढेही वेळोवेळी नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन्स सुरूच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अकोल्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची ही कारवाई निश्चितच धडाडीची ठरली आहे!