२४ तासांत चोरी प्रकरणाचा पर्दाफाश – आरोपी जेरबंद, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

अकोट फाईल | प्रतिनिधी
पोलीस प्रशासनाच्या जलद आणि अचूक कारवाईमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारीला चपराक बसली आहे. अकोट फाईल परिसरातील शादाब नगरमध्ये नुकत्याच घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात पोलीस यंत्रणेला यश आलं असून, १९ वर्षीय चोरटा जेरबंद झाला आहे. त्याच्याकडून तब्बल ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

२७ जुलै रोजी दुपारी ३ ते रात्री ११ दरम्यान, अमिनोददीन महेमुदुल हसन हे कुटुंबासह बाहेरगावी असताना त्यांच्या घरात चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने तब्बल ६ लाख रुपयांची रोकड आणि १० ग्रॅम सोनं असा सुमारे ६.७० लाखांचा ऐवज लांबवला होता. घटनेनंतर अकोट फाईल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथकं तात्काळ स्थापन करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर यांच्या नेतृत्वात एएसआय अनिस पठाण, प्रशांत इंगळे, योगेश काटकर, संतोष चिंचोळकर या अनुभवी पथकाने तांत्रिक विश्लेषणासोबत बौद्धिक कौशल्याचा उत्कृष्ट वापर करून संशयित खिबर उर रहमान (वय १९) याला अटक केली.

तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, २ मोबाईल, सोनं आणि रोकड असा एकूण ₹५,०२,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी सतिश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाली.
कारवाईत शेख रहीम, शेख अख्तर, अनिस पठाण, प्रशांत इंगळे, योगेश काटकर, संतोष चिंचोळकर, हर्षल श्रीवास, ईमरान शाह, गिरीश तिडके, अमिर आणि ओम बैनवाड यांचा मोलाचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published.