सामाजिक न्याय विभाग व जनसेवा फाउंडेशन संयुक्त उपक्रम
अकोला, दि. 23 : केंद्र व राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि जनसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी 14567 (एक चार पाच सहा सात) ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अडचणी सोडविणे, त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे, तसेच त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी हेल्पलाईनचा उपयोग होणार आहे. टोल फ्री क्रमांक एक चार पाच सहा सात ही हेल्पलाईन सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत रोज सुरू राहील. केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर व 1 मे वगळता वर्षभर सेवा सुरू राहील, अशी माहिती जनसेवा फौंडेशनच्या क्षेत्रीय प्रतिनिधी राजेंद्र आहेर यांनी दिली.
आरोग्यविषयक जागृतीसह मिळणार कायद्याचीही माहिती
हेल्पलाईनमार्फत आरोग्यविषयक जागरूकता, निदान, उपचार मिळवून देणे, निवारा, डे केअर सेंटर, पोषणविषयक, ज्येष्ठांसाठीची अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला व करमणूकीची माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे, कायदेविषयक मार्गदर्शन, विवादांचे निराकरण, पेन्शनसंबंधित मार्गदर्शन, मृत्यूपूर्वीचे आवश्यक दस्तऐवजीकरण व विविध शासकीय योजनांची माहितीही दिली जाणार आहे.
मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन
चिंता निराकरण, नातेसंबंध व जीवन व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, वेळ, ताणतणाव, राग व्यवस्थापन, आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. हेल्पलाईनबाबत अधिकाधिक जनजागृती करून ज्येष्ठांना हेल्पलाईनचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.