जगभरात ‘Ghibli’ची क्रेज; पण निर्माते हयाओ मियाझाकी म्हणतात…

सोशल मीडियावर ‘घिब्ली’ फोटोंचा महापूरच आला आहे. OpenAI च्या नवीन फोटो जनरेशन अपडेटमुळे इंटरनेट AI-निर्मित घिब्ली-शैलीतील कलाकृतींनी भरून गेलं आहे. दरम्यान, घिब्लीचे सह-संस्थापक हयाओ मियाझाकी यांचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. स्पिरिटेड अवे आणि माय नेबर तोतोरो यांसारख्या अमर कलाकृतींचे शिल्पकार मियाझाकी यांनी AI ॲनिमेशनला “जीवनाचा अपमान” म्हणत, मानवी भावनांपासून दूर असलेल्या तंत्रज्ञान, अशी टीका केली आहे.

मियाझाकींनी AI निर्मित ॲनिमेशनवर व्यक्त केली तीव्र नाराजी

या व्हिडीओमध्ये काही ॲनिमेटर्स आणि डिझायनर्स मियाझाकी आणि स्टुडिओ घिब्लीचे निर्माते तोशियो सुझुकी यांच्यासमोर AI द्वारे साकारलेले ॲनिमेशन सादर केले आहे. या ॲनिमेशनमध्ये एक विचित्र झोंबीसारखी आकृती दिसते. ते पूर्णपणे अनैसर्गिक आणि भीतीदायक हालचाली करत असते. प्रस्तुतकर्त्यांनी स्पष्ट केले की, AI मानवी कल्पनेच्या पलीकडे हालचाली निर्माण करू शकतो. विशेषतः हॉरर किंवा व्हिडिओ गेमसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हे पात्र नाचत आहे. ते आपल्या डोक्याचा वापर पायासारखा करत आहे. त्याला वेदना जाणवत नाहीत आणि स्वतःच्या डोक्याचे संरक्षण करण्याची जाणीवही नाही. हे भीतीदायक असून झोंबी गेमसाठी आदर्श ठरू शकते.”

ही गोष्ट म्हणजे जीवनाचा अपमान…

मियाझाकींना हे दृश्य अजिबात पटले नाही. त्यांनी आपला संताप व्यक्त करताना म्‍हटलं की, त्यांचा एक मित्र आहे जो स्नायूंच्या आजारामुळे अगदी साध्या हालचालींनाही झुंजतो. AI निर्मित या अनैसर्गिक हालचाली त्यांना त्या मित्राच्या संघर्षाची आठवण करून देतात. यामध्‍ये काहीही मनोरंजक वाटत नाही. मी हे पाहू शकत नाही आणि यात मला काहीही रस वाटत नाही. हे तयार करणाऱ्या लोकांना वेदना म्हणजे काय हेच ठाऊक नाही. मी पूर्णपणे अस्वस्थ झालो आहे. जर तुम्हाला भीतीदायक गोष्टीच निर्माण करायच्या असतील, तर तुम्ही करू शकता; पण मी कधीही अशा तंत्रज्ञानाचा वापर माझ्या कलाकृतींसाठी करणार नाही. त्यांनी पुढे ठाम शब्दांत सांगितले, “मला हे स्पष्टपणे वाटतं की ही गोष्ट म्हणजे जीवनाचाच अपमान आहे!”

AI विरुद्ध कला – वाढत्या चर्चेमुळे सोशल मीडिया दणाणलं

AI निर्मात्यांनी स्पष्ट केलं की, हा फक्त एक प्रयोग आहे. त्याचा कुठलाही व्यावसायिक उपयोग करण्याचा त्यांचा हेतू नव्हता; परंतु या चर्चेने नव्या युगातील कलात्मकता आणि तंत्रज्ञान यामधील सीमारेषा अधिक गडद केल्या आहेत. दरम्यान, OpenAI च्या नवीनतम GPT-4o मॉडेलने संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. AI द्वारे तयार झालेल्या घिब्ली-शैलीतील कलाकृतींनी लोकांना चकित केले आहे. AI विरुद्ध मानवी भावना यावरील चर्चा आणखी गडद झाली आहे. या ट्रेंडचा प्रभाव इतका मोठा आहे की OpenAI चे CEO सॅम अल्टमन यांनीसुद्धा स्वतःचा प्रोफाईल फोटो AI निर्मित घिब्ली-शैलीत बदलला आहे!

Leave a Reply

Your email address will not be published.